
नवं वर्ष, जुनं वर्ष, येणारं वर्ष, गेलेलं वर्ष, सगळंच माणसानेच निर्माण केलेलं. काल एक संपलं, आज दुसरं सुरू झालं म्हणायचं आणि सगळ्यांनी धमाल करायची. तो वायरस तरी काय कमी, नेमका मागच्या वर्षीच्या सुरुवातीला हॅपी न्यू यर म्हणायला जगभर फिरल्यासारखा फिरला आणि आपण माणसांनी उगीचच स्वतःची समजूत घातली की हा आता वर्ष संपेल तेव्हा जाईल कुठेतरी निघून, आपला पिछा सोडून. मनुष्याची विलक्षण इच्छाशक्ती म्हणा किंवा काही दुसरं म्हणा, वर्ष संपायला आल्यावर वायरस गेला नाही तरी लस नावाची आशा माणसानेच निर्माण करून ठेवली. आता काय तर पुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी वायरस नक्कीच जाईल अशी नवीन कॅलेंडर-आशा!
या कॅलेंडर-आशा-निराशेच्या खेळात आपण सगळेच असतो. आपणंच आपल्या वार्षिक सिनेमाचे हिरो-हिरोईन. या वर्षी असं, त्या वर्षी तसं, प्रत्येकाची कहाणी निराळी. २०२० मधल्या सिनेमांचा undercurrent मात्र सगळ्यांचा सारखाच. सर्वांचा एकच खरा गब्बर, बाकी सांबा वगैरे लिंबु-टिम्बु प्रत्येकाचे वेगळे.
माझ्या सिनेमात नेहमीच मी मुन्नाभाई आणि माझी कुंडीतली झाडं म्हणजे सर्किट. सर्किट असला की मुन्ना फॉर्मात असतो तसंच माझं. झाडं आहेत तोवर "ऑल इज वेल" अशी मी मनाची समजूत घालू शकते. मे/जून पर्यंत माझी झाडं छान होती. त्यानंतर मात्र काय झालं माहिती नाही, पण झाडं खूप आजारी पडायला लागली. माती बदलली, शेणखत आणून घातलं, खिडकी बदलली, घरात घेतलं, बाहेर ठेवलं, पाणी वाढवलं, पाणी तोडलं, मी क्वचितच करते ते पण मी केलं - औषध ही फवारलं... कशालाच यश येईना. काही झाडं गेली - 5/6 वर्ष सतत माझ्याबरोबर असलेली झाडं गेली. अगदी मनीप्लान्टनेही मान टाकली. जगातली मरगळ, माझ्यातली मरगळ किंवा माझ्यातल्या जगातली मरगळ – कुठल्यातरी मरगळीचा त्यांना संसर्ग झाला. पाच नवीन टवटवीत झाडं आणली, आठवड्याभरात ती ही गेली! ऐन दिवाळीत पाहुणे येणार त्या दिवशी सकाळी काही झाडं आणली – संध्याकाळपर्यंत तरी जगावीत म्हणून... आणि मग ठरवलं, आता नवीन झाडं आणायची नाहीत, आहेत ती जपायची पण मन गुंतवायचं नाही. मोठा निर्णय! झाडं नसतील तर "ऑल इज वेल" कसं वाटणार?
वर्ष संपलं, आणि वॅक्सिनच्या बातमीचं वारं लागून बळ आल्यागत अचानक फुलं आली. झाडांकडे परत एकदा बघायची इच्छा झाली. ऐन थंडीत झाडांना चैतन्य आलं. कुठूनतरी सर्किटचा आवाज आला - ”भाय! टेन्शन नइ लेनेका!"
Comentarios