top of page

चकली पुराण


मुंबईत असताना दिवाळी आली की चकली पण आपोआप यायची. नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी यांकडून कधी घरी केलेली, कधी दुकानातली तर कधी इधर का माल उधर असं केलेली, कशी का होईना, चकली मात्र आपोआप यायची. कमी पडलीच तर दुकानात मिळायचीच. हॉंगकॉंगला आल्यावरही मुंबईहुन येताना चकली आणली जायचीच आणि बऱ्याच वेळा मुंबईचा खाऊ म्हणूनही ती कुणा न कुणाबरोबर यायचीच. आपल्याला कधी दिवाळीत चकलीच मिळणार नाही असं वाटलं नव्हतं. पण जे वाटत नाही ते होतं आणि जे कधी आपल्या हातून घडेल असा मनात विचारही येत नाही ते घडतं! यावर्षीचा एकंदर सगळा गोंधळ बघता अंदाज आला की आता काही चकली सहजासहजी हाती लागणार नाहीये आणि ती स्वतःच करायची असं ठरवलं.


यापुर्वी कधी त्या वाटेलाच गेले नव्हते. चकली ही भाजणीची असायला हवी आणि ती भाजणी ही थालीपीठापेक्षा वेगळी असते इतकंच माहिती होतं. तरीही बऱ्याच वेळा दुकानातली चकली भाजणीची नसतेच हे ही माहिती होतं. पण मग ती नेमकी कशाची असते इतका विचार केलेला आठवत नाही. इथे भाजणी मिळणं, करणं शक्य नव्हतं म्हणून ती दुसऱ्या "कशाचीतरी" चकली करायचं ठरवलं. मग लक्षात आलं की कुठल्याही पिठाची चकली होतेच! घरात मुबलक असलेलं गव्हाचं पीठ घेतलं आणि चकली करायला घेतली.


घरात आयत्या आलेल्या चकल्यांचे निष्ठुरपणे समीक्षण करताना तेलकट, तिखट, खारट, अळणी, काळपट, लालसर, कडक - अशी विशेषणं मी सढळ हाताने वापरत होते. स्वतः केल्यावर मात्र चकल्यांचे खरेतर आपल्याला सहज सापडतात त्यापेक्षा अनेक वेगळे गुप्त प्रकार आहेत हे लक्षात आलं. त्यातले काही प्रकार मी अनुभवले. अजून अनेक असतील पण मला जे साधले ते खालिलप्रमाणे.


१. नारळ चकली - बाहेरून नारळाप्रमाणे टणक आणि आतून खोबऱ्यासारखी मऊ २. चिंगम चकली (चुईंग गम हा शब्द मराठीत लिहिताना चिंगम असाच लिहावासा वाटतो) - ही चकली नक्की कोणते दात वापरून खावी हे पटकन समजत नाही. समजलंच तर मग ती चावण्याच्या कुठल्या टप्प्यावर गिळावी हे कळत नाही ३. दंतचिकित्सक चकली - ही चकली आपल्या दातांच्या ताकदीची आपल्याला ओळख करून देते ४. उद्घोषक चकली - ही चकली खात असताना अशा काही कुडुमकुडुम घोषणा होतात कि आजूबाजूच्या सर्वांना आपण चकली खातोय ते कळतं ५. दचकली चकली - ही चकली पूर्ण खाल्ली कि तिच्यातले मसाले घशात थैमान घालून आपल्याला दचकवतात ६. गचकली चकली - ही चकली तेलात तळायला सोडताच पंचतत्वात विलीन होते. हाती लागतो तो फक्त भुगा


यावर्षी प्रथमच चकलीची खरी ओळख पटली. इतकी वर्षं इतके प्रकार गुप्त ठेवून फक्त तेलकट, तिखट, खारट, अळणी, काळपट, लालसर किंवा कडक इतक्याच प्रकारच्या चकल्या मला खायला घालणाऱ्या समस्त लोकांचे मनापासून आभार!

Comments


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page