कितीही इलेक्ट्रॉनिक payment करा. घरात नाणी गोळा होतातच. आणि ती जमलेली नाणी कितीही वापरायची ठरवा, वेळेला परत नोट पुढे करणंच सोपं जातं आणि म्हणून परत एकदा सुटे म्हणून अजून काही नाणी घरात येतात. xx.९०, yy.८० अशा किमती लावणारी supermarkets लहान लहान किमतीची नाणी चलनात ठेवतात. जरी त्या नाण्यांच्या किमतीत काहीही मिळत नसेल तरीही ती घरात साठतात, आणि अशा नाण्यांचा एक किमती आणि वजनाने जड असा मोहरांचा ढीग होऊन बसतो.
हाँग काँग मध्ये आल्या आल्या काही महिन्यात मला ही जादूची गाडी सापडली. सरकारच्या अशा २ गाड्या आहेत. वर्षभर एक एक आठवडा असं करत देशभरातल्या वेगवेगळ्या भागांत जाऊन बसतात. तिथे राहणाऱ्यांनी आपआपल्या घरात लपलेली ही संपत्ती गाडीत आणून द्यायची आणि त्या बदल्यात ते त्यांना त्यांच्या ऑक्टोपस card किंवा नोटांमध्ये ती रक्कम देतात. सरकारला नाणी चलनात ठेवायला मदत होते, नवीन नाणी काढावी लागत नाहीत, आणि आपल्या सारख्यांचे घरात उगीच लपलेले पैसे वापरात येतात.
गाडी जादूची का? गाडीबाहेर असलेल्या टोपली मध्ये आपल्या पिशवीमधल्या मोहरा ओतायच्या. टोपली घेऊन गाडीत जायचं, तिथल्या मशीन मध्ये मोहरा ओतायच्या. मशीन खळ्ळकन आवाज करत नाणी मोजत वर असलेल्या स्क्रीन वर बरोब्बर रक्कम दाखवतं. इतकंच नाही, एखादं भलत्या देशाचं नाणं असेल तर ते निवड म्हणून बाहेर ही फेकतं! आपण रक्कम मान्य केली की तेच मशीन receipt छापतं. Receipt घेऊन तिथेच बाजूला असलेल्या काउंटर वर जाऊन आपल्या ऑक्टोपस card वर रक्कम भरून मिळते. हे ऑक्टोपस देश भर ट्रेन, बस, ट्राम, बोट tickets साठी आणि बऱ्याचश्या दुकानात वापरता येतं. हे सगळं काम २ मिनिटात होतं.
कितीही वेळा गेले तरी एखाद्या लहान मुलाला वाटावी तशी त्या गाडीची गंमत वाटत राहते. कसं सुचत असेल या लोकांना, वर्षानुवर्षं कसं काय implement करत असतील, काय गमती जमती challenges असतील या कामातील, कुतूहल वाटत राहतं. सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आपली पिशवी वजनाने हलकी होते, आपले पैसे डिजिटल करून मिळतात,

पण अशा किती पिशव्यांमधील किती वजन घेऊन ही गाडी रात्री तिच्या घरी जात असेल...
Comments